सिनेमा आणि मालिकांचा समाजावर आणि सर्वसामान्य माणसांवर परिणाम होतो का? जेव्हा जेव्हा समाजात काहीतरी भयाण आणि विकृत गुन्हा घडतो तेव्हा तेव्हा हा प्रश्न नेहमी उभा राहिला आहे.. बरेच लोक या प्रश्नाच्या विरोधात ठामपणे उभं राहतात.. समाजावर सिनेमाचा काहीही परिणाम होत नाही असं त्यांचं मत असतं.. पण डॉक्टर मिशेल सी. पॉटस हिने केलेल्या मानसशास्त्रीय प्रयोगात हे सिद्ध झालं आहे कि सिनेमाचा लोकांच्या आणि समाजाच्या मतांवर खोलवर परिणाम होतो.. आणि जर खरोखरच असं होत असेल तर आपल्या समाजाची मापं काढताना वळून आपल्या सिनेमा आणि मालिकांकडे पाहणे सुद्धा आपल्यासाठी क्रमप्राप्त होऊन जाते..
आपली (आणि जागतिकहि म्हणूया) पुरुष सत्ताक संस्कृती नेहमीच आपल्या सिनेमांमधून दिसत आलेली आहे.. बहुतांश चित्रपटात नायिका ही फक्त नाच गाणी प्रेम आणि संकटात सापडणे याच कामासाठी असायची.. आता आता जरा बदल होत असले तरी जेव्हा एका कंपनीने चार हजार भारतीय सिनेमांचा सर्व्हे केला तेव्हा त्यांना जाणवलं कि भारतीय सिनेमात प्रोफेशन वाईज महिलांना नेहमीच दुय्यम स्थान दिलेले आहे.. म्हणजे एकूण चार हजार सिनेमांपैकी ९० टक्के सिनेमांमध्ये नायक पोलीस असतो तर फक्त १० टक्के सिनेमांत स्त्रियांना हा मान मिळतो..
त्या सोबतच पुढारलेली महिला म्हणजे वाया गेलेली महिला हे सुद्धा आपल्या मालिका आणि सिनेमा गेली बरीच वर्ष नेटाने राबवतायत.. राज कपूर च्या काळात एक भुवई वर करून मद्य पान करणारी आणि मॉडर्न वेशभूषा करणारी नादिरा व्हिलन तर सोज्वळ भारतीय नर्गिस नायिका.. मैने प्यार किया मध्ये मॉडर्न परवीन दस्तुर वाईट तर भोळी भारतीय भाग्यश्री चांगली.. आज मालिकांमध्ये सुद्धा हाच ट्रेंड जोरावर आहे.. घर तोडणारी मॉडर्न शनाया असते तर जोडून ठेवणारी भारतीय राधिका.. पुढारलेल्या विचारांची, सुशिक्षित आणि मॉडर्न महिला म्हणजे उचशृंखल, वाया गेलेली आणि अजिबात संस्कार नसलेली असते.. ती काहीही करायला तयार असते .. आणि त्यात तिला काहीच वावगं वाटत नाही.. आपली गाणी सुद्धा आपल्या समाजात हाच ठराविक संदेश घेऊन फिरताना दिसतात.. आयदर स्त्री ने ‘तुम्ही मेरे मंदीर.. तुम्ही मेरी पूजा.. तुम्ही देवता हो..’ हा आदर्श पुरुषा बद्दल बाळगायचा किंवा ‘मैं तो तंदुरी मुर्गी हुं यार’ असं म्हणायचं.. त्यातही महिलांच्या जाणिवांबद्दल जेव्हा केव्हा बॉलिवूड सिनेमा बनवतो तेव्हा सुद्धा सेक्स हा त्याचा अविभाज्य भाग असतो जणू काही इथेच सबलीकरण होण्याची गरज आहे..
या साऱ्याला अपवाद नक्कीच आहेत.. एक नाही तर बरेच सिनेमे आहेत आणि आता बदलत्या काळानुरूप परिस्थिती अधिक समाधानकारक होतेय यात शंका नाही पण तरीही आपले (आणि कदाचित जागतिक सुद्धा) सिनेमे एक ठराविक अजेंडा किंवा जेंडर रोल घेऊन प्रवास करतायत हे आपण नाकारू शकत नाही..
मग काय करायचं? सिनेमा पहायचे नाहीत का? तर असं नाहीए.. आपल्या समाजाला मोरल आणि सिविक एज्युकेशन ची नितांत गरज आहे.. सिनेमा आणि खरं जीवन यातली सीमारेषा कित्येकांसाठी फारच पुसट आहे.. ती अधिक गडद करण्याचं काम व्हायला हवं.. कुठलीही कलाकृती माणसाला मुळापासून बदलू शकत नाही पण जर एखादा माणूस एखाद्या विचार धारेच्या किनार्याशी येऊन थांबला असेल तर त्याचा प्रवास नक्कीच ठरवू शकते.. म्हणून सिनेमा बनवणाऱ्यावर जितकी याची जवाबदारी आहे तितकीच आपल्या प्रेक्षकांची सुद्धा आहे.. कशाचं आणि किती उदात्तीकरण खपवून घ्यायचं हे आपल्याच हातात तर आहे..
जेव्हा कबीर सिंग हिरोईनच्या कानाखाली मारतो आणि आपल्या शेजारच्या खुर्चीवर बसलेला माणूस आनंदाने टाळ्या वाजवतो आणि ‘इसको ऐसा हि चाहीए’ असं म्हणतो, हा आपल्यासाठी सोशल अलार्म असला पाहिजे.. नाही का?
Image Sorce: https://theatlas.com/charts/S1AaeRQ6W
Comments