सिनेमाची पटकथा लिहिणं हा नेहमीच गमतीचा भाग असतो.. कारण कथा तुम्ही कशी सांगता यावर बरच काही अवलंबून असतं.. एक छोटीशी गोष्ट सुद्धा सिनेमाला पुर्णपणे बदलू शकतो.. त्यामुळे हे अतिशय सावधपणे ठरवावं लागतं की स्टोरी टेलर म्हणून आपल्याला कथा सांगायची कशी आहे.. कथा अनेक प्रकारे सांगता येते.. कुठल्याही नॉर्मल सिनेमासारखी सुरुवातीपासून शेवट पर्यन्त एका क्रमाने.. किंवा मग वर्तमान आणि भूतकाळ यांच्यात ये जा करत बॅक अँड फोर्थ पद्धतीनेही.. पण स्टोरी टेलिंगच्या काही पद्धती या सगळ्या चौकटी तोडणार्या असतात.. आणि त्यातलीच एक पध्दत म्हणजे ‘फाऊंड फुटेज’ फॉरमॅट..
फाऊंड फुटेज फॉरमॅट म्हणजे कुठल्याही व्हिडिओ शूटिंग माध्यमावर रेकॉर्ड झालेल्या फुटेज प्रमाणे शूट केलेला सिनेमा.. पाहताना आपण कुणाचा तरी होम व्हिडिओ पाहतोय असा फील यावा असा.. मी या पद्धतीचा पाहिलेला पहिला सिनेमा होता ‘दी ब्लेयर विच प्रोजेक्ट’.. या सिनेमात कॉलेजचे तीन विद्यार्थी ब्लेयर विच च्या जंगलात घडलेल्या एका विचित्र सत्य घटनेवर डोक्युमेंट्री बनवायला जातात आणि चकवा लागल्या गत जंगलातच अडकतात.. त्यांचा हा सारा भयावह प्रवास त्यांनी शूटसाठी नेलेल्या कॅमेरा मध्ये कैद होतो आणि तोच आपण अन एडिटेड पाहतोय असं म्हणून आपल्याला सिनेमा दाखवला जातो..
सिनेमाची पब्लिसिटी करतानाही त्यांनी सिनेमात दिसणारे तीनही लोक बेपत्ता आहेत आणि जंगलात त्यांचे कॅमेरे आम्हाला सापडले आहेत आणि हे त्यातलं खरं खूर फुटेज आहे अशीच केली होती.. मी जेव्हा हा सिनेमा पाहिला होता तेव्हा हा प्रकार खरोखर नवीन होता.. या सिनेमाने मला पुष्कळ घाबरवल होतं.. हे खरं कुणासोबत घडलं आहे असच मला वाटत होतं.. पण एक मन याला नकारही देत होतं.. पुढे हा सगळा प्रकार स्क्रिपटेड होता हे कळलं आणि ब्लेयर विच च्या भीतीतून मी बाहेर पडलो पण सिनेमाची कथा मांडायचा हा वेगळा प्रकार माझ्या हाती लागला..
या प्रकारचे सिनेमे बनवणं आणि स्पेशली डिरेक्ट करणं खूप जास्त कठीण असावं असं माझं मत आहे.. एकतर सगळा सिनेमा किंवा सगळे सीन्स हे प्रामुख्याने वन शॉट असतात.. कथानक एकाच ठिकाणी घडतं अथवा एखाद्या ग्रुपच्या एकत्र प्रवासात.. ट्रोली, क्रेन, क्लोजअप असं काहीच शॉट डिव्हिजन नसतं आणि हे करताना हे भान ठेवावं लागतं की ज्या माध्यमावर शूट होतंय त्याची बॅटरी किती काळ चालणार आहे.. हा सिनेमा नीट जमला नाही तर अतिशय बोअर सुद्धा होऊ शकतो..
ब्लेयर विच नंतर असे अनेक सिनेमे मी शोधून पाहिले.. असे बहुतेक सिनेमे हे भयपट कॅटेगरीमध्ये येतात.. पण 2008 साली आलेला ‘क्लोवर फील्ड’ हा त्याला अपवाद आहे.. हा गोडझिला किंवा किंग काँग सारखा दानव शहरात येवून धुमाकूळ घालतो अशा आशयाचा सिनेमा आहे.. इतक्या भव्य दिव्य स्कोपचा सिनेमा त्यांनी फाऊंड फुटेज सारख्या फॉरमॅट मध्ये अतिशय लाजवाब प्रकारे बसवला आहे.. एकदा बघाच..
याच फाऊंड फुटेजची पुढची आवृत्ती म्हणून आता स्क्रीन रेकॉर्ड अशा फॉरमॅटचे ही सिनेमे येऊ लागले आहेत.. 2014 साली आलेला अनफ्रेंडेड नावाचा भयपट हे त्याचच उदाहरण म्हणता येईल..
हिंदीत सुद्धा असे काही प्रयत्न झाले आहेत.. रागिनी MMS हा त्यातलाच एक म्हणता येईल.. यातल्या बर्याच सिनेमांच्या कथा सरधोपटच आहेत पण फक्त मांडणीच्या वेगळेपणा मुळे ते सिनेमे वैशिष्ठपूर्ण झाले आहेत.. फाऊंड फुटेज सारखे कथा मांडणीचे अनेक फॉरमॅट आहेत.. अजून एखाद्या फॉरमॅटबद्दल पुन्हा लिहिनीच.. तोवर सिनेमे पहा आणि तुम्ही शोधा एखाद्या वेगळ्या मांडणीचा सिनेमा तुम्हाला सापडतो आहे का?
Image Sorce: Google Images
Comments