top of page
Search
Writer's pictureOmkar Mangesh Datt

आधी उत्तम प्रेक्षक बनुया?

Updated: Mar 18, 2020

कुठलाही नवा सिनेमा आला कि आपल्या प्रत्येकातला एक समीक्षक डोकं वर काढतो.. सोशल मीडियाच्या जमान्यात तर अगदी सोप्प झालं आहे.. पार ट्रेलरची सुद्धा समीक्षा करतात आजच्या काळात.. हरकत नाही.. करावी समीक्षा.. अगदी प्रत्येकाने करावी.. उत्तम सिनेमा कसा असावा यावर प्रत्येकाने आपलं मत मांडावंच.. पण उत्तम प्रेक्षक कसा असावा यावर चर्चा होणे गरजेचे नाहीए का? तुम्ही मेकर्स करून चांगल्या सिनेमाची अपेक्षा करताय तसं त्यांनी तुमच्याकडून चांगल्या प्रेक्षकांची अपेक्षा करणं अवाजवी आहे का? आपण चांगला सिनेमा किंवा वाईट सिनेमा या विषयावर खूप बोलतो, लिहितो.. पण चांगला प्रेक्षक आणि वाईट प्रेक्षक याबद्दल कधीच फारशी चर्चा होत नाही..


मागे मर्दानी पाहायला गेलो तेव्हाचा किस्सा, असेच तीन वाईट प्रेक्षक आमच्या पुढच्या रांगेत बसले होते.. त्यांनी थिएटरमध्ये इंन्ट्री घेतली तेव्हाच ते अतिशय हसत खिदळत मोठमोठ्याने बोलत आत शिरले होते.. सिनेमाच्या आधीच्या जाहिराती आणि ट्रेलर दरम्यान ते जोरजोरात शेरेबाजी करत होते.. हसत टाळ्या देत होते.. समोर येऊन बसल्यावरच वातावरणात दारूचा जो वास पसरला होता त्यावरून हे लगेच लक्षात आलं होतं कि हे तिघेही पिऊन आले होते.. तरी इथपर्यंत ठीक होतं.. कारण सिनेमा सुरु झाला नव्हता.. पण सिनेमा सुरु झाल्यावर सुद्धा चित्र फारस बदललं नाही.. उलट अजून भीषण झालं.. सिनेमातल्या गंभीर परिस्थितीमध्ये सुद्धा यांना विनोदी काहीतरी सापडत होतं.. मध्ये मध्ये whatsapp वर मेसेज करणं सुरु होतं.. आणि सगळ्यात राग आणणारी गोष्ट होती कि, ते सिनेमाच्या नायिकेशी सोडून त्यातल्या खलनायकाशी जास्त समरस होत होते.. त्याची अतिशय चीड येणारी स्त्री विषयक विधानं कुठेतरी त्यांना सुखावत होती असं सतत वाटत होतं.. अतिशय अनकम्फर्टेबल आणि निगेटिव्ह वाईब्स त्या तिघांकडून येत होत्या.. आणि फक्त मलाच नाही तर माझ्या सोबत असलेल्या माझ्या बायकोला सुद्धा.. अखेर तिने मध्यंतरात मला सीट्स बदलायला लावल्या.. (आजच्या काळात जिथे गरज नसेल तिथे फालतू वाद घालू नये असं तिचं ठाम मत आहे..) त्यामुळे सेकंड हाफ आम्ही शांतपणे पाहू शकलो.. सिनेमा संपल्यावर जेव्हा सगळा प्रेक्षकवर्ग हा अतिशय शॉक मध्ये तेव्हा ते तिघे थिएटरमधून बाहेर पडणारे पहिले होते आणि अगदी गोलमाल किंवा धमाल सारखा एखादा तद्दन विनोदी चित्रपट पाहिल्या प्रमाणे हसत खिदळत बाहेर पडत होते..

प्रेक्षकाने सिनेमा सोबत संवाद साधण्यात वावगं काहीच नाही.. लोकांनी विनोदी सिनेमात हसणं.. हिरोच्या एंट्रीला टाळ्या शिट्या वाजवणं.. व्हिलनला हूट आउट करणं, शिव्या घालणं.. आयटम सॉंग वर धिंगाणा घालणं.. लगान मधली क्रिकेट मॅच पाहताना त्याला रिऍक्ट करणं.. एखाद्या दु:खद प्रसंगावर रडणं.. हे सारं प्रेक्षकांनी थिएटरमध्ये बिन दिक्कत करावं.. सिनेमा पाहण्याची ब्युटी सुद्धा हीच आहे.. पण या सऱ्याच्या पलीकडे जाऊन इतर प्रेक्षकांचा रसभंग होईल अशा गोष्टी थिएटरमध्ये करणाऱ्या प्रेक्षकांना काय बरं म्हणायचं? तुमच्या पैकी प्रत्येकाला अशा प्रकारच्या भीषण सहप्रेक्षकाचा अनुभव नक्कीच आला असेल.. हे प्रेक्षक एक तिकीट विकत घेतो आणि अख्ख थिएटर विकत घेतल्याच्या थाटात वावरतो.. मोठमोठ्याने बोलतो.. नको तिथे शेरेबाजी करतो.. आणि आजकाल मोबाईलच्या जमान्यात तर बिनधास्त मोबाईलवर बोलतो सुद्धा.. तेही मोठमोठ्याने..


नाटकांना सुद्धा अशा प्रेक्षकांचा फटका वारांवार बसतच असतो.. नाटकात मोबाईल वाजणे, मोबाईल वर प्रेक्षकांनी बोलणे आणि त्यामुळे प्रयोग बंद पडणे हे प्रकार आपल्याला नवीन नाहीत.. तरीही असे प्रेक्षक रोज सापडत असतात.. अगदी न चुकता.. असा प्रेक्षक सिनेमा/नाटक पहायला का येतो? त्याला नक्की काय पहायचं असतं? हा खरं तर रिसर्च करायचा मुद्दा आहे.. पण यातून आपल्या समाजाबद्दल सुद्धा आपल्याला खूप काही कळत.. अशा लोकांना टोकलं कि ते दुसऱ्याशी वाद घालतात.. इतर प्रेक्षकांच्या सिनेमा व्ह्यूविंग एक्सपिरिअन्सशी त्यांना काही घेणं देणं नसतं.. आपल्या अशा वागण्याने दुसऱ्यानं त्रास होतोय हे मुळी त्यांच्या गावीच नसतं.. संस्कृती आणि संस्कारांच्या नावाने डांग आपटणाऱ्या आपल्या देशात इतके बेसिक संस्कार सुद्धा नाहीत हे खरच हास्यास्पद आहे..

आपण सिनेमा मेकर्सना चांगले सिनेमे बनवण्याची अक्कल पावलो पावली शिकवत असतो.. चित्रपटांची मापं काढत असतो.. पण एक चांगला जवाबदार प्रेक्षक बनण्याकडे किंवा बनवण्याकडे आपला कल अजिबात नाहीए.. मान्य आहे हि समस्या अगदी छोटी आहे.. कित्येकदा दुर्लक्ष करण्यासारखी सुद्धा आहे, पण असा एक नासका प्रेक्षक एका संपूर्ण भरलेल्या चित्रपट गृहातील प्रत्येकासाठी त्या चित्रपटाचा अनुभवच बदलून टाकतो तेव्हा माझ्यामते प्रत्येक चित्रपट प्रेमीसाठी हि गोष्ट महत्वाची होऊन जाते..



Image Sorce: Wikipedia



13 views0 comments

Comments


bottom of page